गंगापूर तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक मतदार यादीचा कार्यक्रम स्थगित

Foto
विधानसभा मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणामुळे राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेला मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने तूर्तास स्थगित केला आहे. विधानसभा मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने १५ जुलै रोजी २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या गंगापूर तालुक्यातील एकूण ७७ ग्रामपंचायतींसाठी मतदार यादी तयार करण्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार २४ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून २९ जुलैपर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार होत्या. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजन होते.

मात्र, भारत निवडणूक आयोगामार्फत विधानसभा मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू असल्याने अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत मतदार यादी कार्यक्रमास मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. तसेच विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरच ग्रामपंचायत मतदार यादी कार्यक्रम राबविण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. राज्यातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींपैकी अत्यल्प ग्रामपंचायतींच्याच प्रारूप मतदार याद्या तयार झाल्याचेही आयोगाच्या निदर्शनास आले आहे. 

या सर्व बाबींचा विचार करून २४ जुलै रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार याद्या स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया काही काळ पुढे ढकलली जाणार अच, सुधारित कार्यक्रमाची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे.

निवडणुका ग्रामपंचायतींच्या अनावश्यकपणे लांबू नयेत. सुधारित कार्यक्रम शक्य तितक्या लवकर जाहीर करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करावी. यामुळे गावांच्या विकासकामांनाही गती मिळेल.
- बशीर पटेल, माजी सरपंच, जामगाव 


-